चिमुकल्यांना जर बरे वाटत नसले तर ते त्यांना कळत नसते. पण त्यांची कुरकूर सुरू असते. बदलत्या ऋतुमानानुसारही त्यांच्या अाराेग्यात बदल हाेत असतात.
चिमुकल्यांना जर बरे वाटत नसले तर ते त्यांना कळत नसते. पण त्यांची कुरकूर सुरू असते. बदलत्या ऋतुमानानुसारही त्यांच्या अाराेग्यात बदल हाेत असतात. म्हणूनच बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांचा आहार-विहार आणि एकूणच दिनक्रम कसा असावा याविषयी मार्गदर्शन करणारा हा विशेष लेख. . .
दिनक्रमाकडे जर नीट लक्ष पुरवलं गेलं तर पुढचं आयुष्य निरोगी राहायला नक्कीच मदत होते. अगदी तान्ह्या बाळाला आईच दूध हे अनुसरून अमृततुल्य असतं. त्या वेळी त्याला इतर कशाचीही गरज नसते. पण हे आईचं दूध योग्य प्रमाणात त्याला मिळावं म्हणून बाळाच्या आईनंही स्वतःकडे अगदी गर्भधारणेपासूनच संपूर्ण लक्ष द्यायला हवं. या तान्ह्या बालकाला आईच्या दुधातून आवश्यक सगळी पोषणमूल्ये मिळतात. आईचं दूध काही कारणांनी मिळालं नाही तर या बालकाला गायीचं दूध द्यावं. ही गायदेखील अत्यंत निरोगी असणे आवश्यक असणे अपेक्षित आहे. या बालकाला पहिले ६ महिने आईच्या दुधावरच ठेवावं. नंतर पुढचे ६ महिने थोडं पातळ अन्न द्यायला सुरुवात करायची आणि एक वर्षाचं मूल झाल्यावर त्याला थोडं अन्नही (वरण, भात, खिचडी इ.) द्यायला सुरुवात करावी. या बालकांना बाहेरचे दूध द्यायचं झालं तर गायीचं दूध द्यावं. ते पोषण नीट करते, बुद्धी नीट वाढावी यासाठी गायीच्या दुधात जेष्ठमधाचे चूर्ण टाकून ते मिश्रण त्यांना द्यावं. मेध्य रसायन (म्हणजे बुद्धीला हितकर) असाच याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात आहे. बालकांच्या दिनचर्येत महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे अभ्यंगस्नान होय. या बालकांना त्यांच्या शरीराच्या योग्य वाढीसाठी, त्याचे बाळसे धरण्यासाठी अंघोळीच्या आधी उत्तम प्रकारे तेल लावण्याची आवश्यकता असते.
या तेलाचे थेंब त्या बालकाच्या कानात, नाकात टाकणे हेही आरोग्यदायी आहे. मात्र तेल स्वच्छ असावे, बाधाकारक नसावे. बाळाला या अंंघोळीच्या वेळी डाळीचं पीठ, दूध हेही मिश्रण लावावं. यामुळे त्वचा तुकतुकीत राहायला मदत होते. त्यांच्या डोळ्यांची काळजी अगदी लहानपणापासून घ्यावी लागते. त्याला तीव्र उन्हात नेता कामा नये. घरातही ट्यूबलाइटखाली बालकाला झोपवू नये. बाळ जसजसे वयाने मोठे होते तसतसा त्याचा आहारही वाढत जातो. त्या बालकाची भूक वाढते. या काळात योग्य तो पोषक आहार देण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये वरण-भात, मुगाची खिचडी, पोळी/ भाकरी, भाज्या, चटणी, काही फळे, दूध, मधुर पदार्थ, पोहे, शिरा, सांजा इत्यादी पोषक पदार्थ मुलांना देणे आवश्यक असते. याएेवजी हल्ली ब्रेड, पावभाजी, फास्टफूड, आइस्क्रीम, चॉकलेट्स, बिस्कीट, फरसाण, वेफर्स असे पदार्थच मुलं जास्त प्रमाणात खाताना दिसतात. नैसर्गिक पेय सोडून कृत्रिम शीतपेयांच्या मागे लागतात आणि शरीराचे नुकसान करून घेतात. ही गोष्ट टाळायला पाहिजे.
यासाठी बालकाबरोबरच पालकांचेही प्रबोधन व्हायला हवे. या मुलांनी गोड, तिखट, खारट, आंबट, तुरट, कडू अशा सहाही चवींचा आहार घ्यायला हवा. आठ वर्षांच्या पुढच्या बालकांनी सूर्यनमस्कारसारखा उत्तम व्यायाम करणे हाही त्यांच्या दिनचर्येतला एक अविभाज्य भाग समजला पाहिजे. स्नायू पिळदार करण्यासाठी, पचन-बुद्धी नीट राहण्यासाठी या व्यायामाचा चांगला फायदा दिसतो.
मुले आणि मुली वयात येतात त्यांना एकूणच लैंगिक शिक्षण योग्य तऱ्हेने देण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीरात असणाऱ्या प्रजनन संस्थेची ओळखही त्यांना या वयात झाली पाहिजे. दूरदर्शनच्या किती जवळ जायचं याचेही नीट शिक्षण त्यांना द्यायला हवं. अभ्यासासाठी सकाळी लवकर उठणं हे आरोग्यदायी असते. जागरण करून अभ्यास केल्याने मेंदूवर अधिक ताण पडतो. कारण ती वेळ ही झोपेची-मेंदूच्या विश्रांतीची असते हेही मुलांच्या डोक्यात शिरले पाहिजे.
यावर त्यांचे एकूण आरोग्य अवलंबून असते. वयात येताना या मुला-मुलींमध्ये शारीरिक बदलांप्रमाणे मानसिक बदलही घडत असतात. त्यामुळे त्यांच्या मनावर त्यांचे नियंत्रण राहील याचीही दक्षता घ्यावी लागते. यासाठी त्यांच्या दिनचर्येत योगाचा नीट समावेश करणे, काही स्तोत्रांचे पठण करणे हे अपरिहार्य भाग झाले पाहिजेत. गणित पक्के होण्यासाठी, स्मृतीला चालना देण्यासाठी पाढे म्हणणे हाही त्यांचा दिनचर्येतला एक भाग असावा. योग्य त्या वाचनाची सवय त्यांना लावणे हेदेखील आवश्यक असते. कारण चांगल्या वाचनाचा मनावर चांगला परिणाम होतो. व्यायामाप्रमाणेच या मुलांच्या दिनचर्येत क्रीडांगणावर जाऊन मैदानी खेळ खेळणंही असले पाहिजे. विटी-दांडू, कबड्डी, खो-खो हे खेळ खेळणे हल्ली खूपच कमी झाले आहे. त्याचं प्रमाण वाढायला हवं. एकूणच लहान बालकापासून मोठ्या बालकांपर्यंत दिनचर्या त्या त्या वयानुसार असायला हवी.